Skip to content
Menu

मुंबई हायकोर्ट लिपिक भरतीच्या टायपिंग टेस्टमध्ये गोंधळ

August 17, 2026
महाराष्ट्र

मुंबई हायकोर्ट लिपिक भरतीच्या टायपिंग टेस्टमध्ये गोंधळ

डोंबिवली : मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदाच्या भरतीसाठी सुरू असलेल्या टायपिंग टेस्टमध्ये रविवारी कल्याण येथील परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परीक्षा केंद्रावर संगणक आणि सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अनेक उमेदवारांना परीक्षा पूर्ण करता आली नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सुमारे ५०० उमेदवारांनी परीक्षा केंद्राबाहेर ठिय्या मांडत प्रशासनाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी केली.

मुंबई उच्च न्यायालयातील सुमारे ८०० लिपिक पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे. राज्यभरातील विविध केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली असून, या भरतीसाठी जवळपास सात हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी सुमारे ५०० उमेदवारांचे परीक्षा केंद्र कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत होते.

सर्व्हर डाऊन, संगणकही झाले बंद
कल्याण केंद्रावर उमेदवार तीन वेगवेगळ्या बॅचमध्ये परीक्षा देणार होते. मात्र, परीक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळातच तांत्रिक अडचणी निर्माण होण्यास सुरुवात झाली. काही संगणक अचानक हँग झाले, तर काही ठिकाणी की-बोर्ड व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रार उमेदवारांनी केली.

काही संगणकांवर ‘इंटरनल एरर’चे संदेश दिसत होते. सर्व्हरमध्येही अडचण निर्माण झाल्याने परीक्षा पूर्ण केल्यानंतर मिळणारा निकाल किंवा त्याची प्रिंटही उपलब्ध होत नव्हती. काही परीक्षा कक्षांमध्ये वीज किंवा प्रकाशाची समस्याही निर्माण झाल्याचे उमेदवारांनी सांगितले.

या सर्व प्रकारामुळे परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांचा गोंधळ उडाला. वापरण्यात आलेली संगणक यंत्रणा जुनी आणि योग्य देखभाल न केलेली असल्याचा आरोपही काही परीक्षार्थींनी केला.

दुसऱ्या-तिसऱ्या बॅचचे उमेदवार ताटकळत
पहिल्या बॅचमधील उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याने परीक्षा प्रक्रिया विस्कळीत झाली. त्याचा परिणाम पुढील बॅचवरही झाला. दुसऱ्या आणि तिसऱ्या बॅचमधील अनेक उमेदवारांना बराच वेळ परीक्षा केंद्राबाहेरच थांबावे लागले.

दुपारनंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने उमेदवारांचा संताप वाढला. अखेर मोठ्या संख्येने परीक्षार्थींनी केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.

पोलिसांसह न्यायालयीन अधिकाऱ्यांची धाव
परीक्षा केंद्रावर परिस्थिती चिघळू लागल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर कल्याण न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले. संबंधित अधिकारी आणि हायकोर्ट भरती विभागाचे प्रतिनिधीही केंद्रावर दाखल झाले.

अधिकाऱ्यांनी उमेदवारांशी चर्चा करत तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले. मात्र, केवळ तोंडी आश्वासनावर समाधान न मानता पुन्हा परीक्षा कधी घेतली जाणार, याची लेखी माहिती देण्याची मागणी उमेदवारांनी केली.