दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार; पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही : फडणवीस
मुंबई : महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळाच्या संकटातून मुक्त करण्याचा राज्य सरकारचा निर्धार असून, त्यासाठी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून दुष्काळी भागात पाणी पोहोचविण्यावर भर दिला जात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मंत्रालयात भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करत राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणातून त्यांनी सरकारच्या विविध विकासकामांचा आढावाही मांडला.
दुष्काळी भागात नदीजोड प्रकल्पांचा आधार
महाराष्ट्राच्या मागील पिढ्यांनी दुष्काळाचा सामना केला आहे. मात्र, भविष्यातील पिढीला ही परिस्थिती पाहावी लागू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी
शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना राबविण्यात येत असून, या योजनेतून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या योजनेतही प्रगती झाली असून सध्या राज्यातील ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. पुढील वर्षभरात राज्यातील १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे उद्दिष्ट असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
महिलांनाही शेतकऱ्याचा दर्जा
महिला शेतकरी कायदा तयार करून महिलांना शेतकऱ्याचा दर्जा देण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतला असून, असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
महिलांसह समाजातील वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध लक्षित योजना राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक जिल्हा विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’
महाराष्ट्र देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य असून, यंदाच्या पहिल्या सहामाहीत राज्याचा आर्थिक विकासदर जवळपास ८.८ टक्के राहिला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आतापर्यंत सुमारे १३ जिल्ह्यांनी निर्धारित विकासाचे लक्ष्य पूर्ण केले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
गडचिरोली, पालघर, नंदुरबारसह राज्यातील प्रत्येक भागात विकासाची गती पोहोचविण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
युवकांसाठी शिक्षण आणि रोजगारावर भर
राज्यातील युवकांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ‘एज्युसिटी’च्या माध्यमातून परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील विद्यापीठांचा दर्जा उंचावण्यासोबतच आधुनिक आणि अत्याधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.
महाराष्ट्र देशाचे ‘स्टार्टअप कॅपिटल’ बनत असून, राज्यात मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत तसेच परकीय गुंतवणूक होत आहे. त्यामुळे युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
“देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राची भूमिका आजही महत्त्वाची आहे आणि भविष्यातही देशाच्या विकासाचा सर्वात मोठा वाटेकरी महाराष्ट्र असेल,” असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.