पान मसाल्याच्या जाहिरातीवर FDAची कारवाई; अजय देवगण, शाहरुख खान, टायगर श्रॉफला नोटीस
मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पान मसाल्याशी संबंधित जाहिरातीच्या प्रकरणात अभिनेता अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पान मसाल्याशी संबंधित उत्पादनाची अप्रत्यक्ष जाहिरात केल्याचा आरोप करत FDAने तिन्ही अभिनेत्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
FDAच्या मते, जाहिरातीत दाखवण्यात येणाऱ्या उत्पादनाचा ब्रँड पान मसाल्याशी जोडला जात असल्याने ही जाहिरात सरोगेट जाहिरातीच्या स्वरूपाची असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे संबंधित कलाकारांची भूमिका काय आहे, याबाबत त्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे.
तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDAची धडक कारवाई
अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त खाद्यपदार्थ, अस्वच्छ आस्थापना आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायांविरोधात कारवाई सुरू आहे.
नामांकित हॉटेल असो किंवा मोठा ब्रँड, नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई केली जाईल, अशी भूमिका FDAकडून घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता पान मसाल्याच्या जाहिरातीच्या प्रकरणात थेट बॉलीवूड सेलिब्रिटींना नोटीस बजावण्यात आली आहे.
कुणाला कुठे नोटीस?
अजय देवगण यांच्या जुहू येथील निवासस्थानी, शाहरुख खान यांच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ निवासस्थानी, तर टायगर श्रॉफ यांना त्यांच्या Tiger Shroff Productions LLP या प्रॉडक्शन हाऊसमार्फत नोटीस देण्यात आली आहे.
१३ जुलै २०२६ रोजीच्या आदेशानुसार महाराष्ट्रात पान मसाल्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जाहिरातीतील त्यांच्या सहभागाबाबत FDAने तिन्ही कलाकारांकडून उत्तर मागितले आहे.
आता या नोटिसांना अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ काय उत्तर देतात, याकडे लक्ष लागले आहे.
तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई आणखी तीव्र
दरम्यान, महाराष्ट्र FDAकडून तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा-पान मसाल्याच्या प्रतिबंधित उत्पादनांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. अशा उत्पादनांच्या संघटित नेटवर्कवर कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने MCOCA अंतर्गत कारवाई करण्याची तयारीही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक आणि विक्रेत्यांसोबतच अशा उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींची भूमिकाही आता तपासाच्या कक्षेत आली आहे.