ममता बॅनर्जींच्या जवळच्या सहकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; माजी उपसभापती आशिष बॅनर्जींचा पक्ष कार्यालयात गळफास
बीरभूम : पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपसभापती आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आशिष बॅनर्जी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या टीएमसीच्या पक्ष कार्यालयात रविवारी त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
आशिष बॅनर्जी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जवळचे सहकारी मानले जात होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी या प्रकरणाचा अधिकृत तपास सुरू केला आहे.
मृतदेहाजवळ सुसाईड नोट
पोलिसांना आशिष बॅनर्जी यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडल्याचे समोर आले आहे. मात्र, या चिठ्ठीत नेमके काय लिहिले आहे, याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी परिसरातील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांची तपासणी सुरू केली आहे. मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.
पाच वेळा आमदार, ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये मंत्रिपद
आशिष बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तब्बल पाच वेळा विजय मिळवला होता. २००१, २००६, २०११, २०१६ आणि २०२१ या निवडणुकांमध्ये त्यांनी रामपूरहाटचे प्रतिनिधित्व केले.
ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली होती. तसेच पश्चिम बंगाल विधानसभेचे उपसभापती म्हणूनही त्यांनी काम केले.
मात्र, यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला. भाजपचे उमेदवार ध्रुबा साहा यांनी रामपूरहाट मतदारसंघात आशिष बॅनर्जी यांचा पराभव केला.
शिक्षक ते ज्येष्ठ राजकीय नेता
राजकारणात येण्यापूर्वी आशिष बॅनर्जी हे शिक्षक होते. दीर्घकाळ रामपूरहाटच्या राजकारणात सक्रिय राहिलेल्या बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही खळबळ उडाली आहे.