Skip to content
Menu

SCO Summitमध्ये पंतप्रधान मोदींचा दहशतवादावर घणाघात; भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे

September 1, 2026
देश-विदेश,मुख्य बातम्या

सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि संधीवर भर; दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांविरोधात एकजुटीचे आवाहन

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) २६व्या शिखर परिषदेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी दहशतवाद, प्रादेशिक सुरक्षा, कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि आर्थिक सहकार्य यांसह विविध मुद्द्यांवर भारताची भूमिका मांडली. दहशतवादाला कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन किंवा पाठिंबा दिला जाऊ नये, असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला. त्यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे…

१. सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि संधी

SCO सहकार्याचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि संधी यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. भविष्यातील आव्हानांचा विचार करून या तिन्ही क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक मजबूत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

२. दहशतवादाची परिसंस्था उद्ध्वस्त करण्याचे आवाहन

दहशतवादाला कोणत्याही प्रकारचे समर्थन मिळता कामा नये, अशी भूमिका भारताने मांडली. दहशतवाद्यांना होणारी आर्थिक मदत, त्यांना प्रोत्साहन देणारे घटक, कट्टरतावाद आणि सुरक्षित आश्रयस्थाने यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज मोदी यांनी अधोरेखित केली.

३. दहशतवादाविरोधात एकजूट आवश्यक

दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर एकसंध भूमिका असणे आवश्यक आहे. दहशतवादाचा वापर कोणत्याही देशाच्या धोरणाचा किंवा रणनीतीचा भाग होऊ नये, यासाठी सर्व देशांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

४. अफगाणिस्तानला मदतीची गरज

अफगाणिस्तानातील नागरिकांना सातत्याने विकासात्मक आणि मानवतावादी मदत मिळणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी सांगितले. यामुळे अफगाणिस्तानमध्ये शांतता, स्थैर्य आणि आर्थिक विकासाला चालना मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.

५. संघर्षांवर संवादातून तोडगा

प्रादेशिक संघर्षांमुळे जागतिक ऊर्जा सुरक्षा, सागरी व्यापार आणि पुरवठा साखळीवर परिणाम होऊ नये, यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्यावर भर देण्यात आला. कोणतेही प्रकल्प राबवताना संबंधित देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे, असेही स्पष्ट करण्यात आले.

६. अमली पदार्थ आणि संघटित गुन्हेगारीविरोधात सहकार्य

SCOच्या यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय आणि वेळेवर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी सांगितले. अमली पदार्थांची तस्करी, संघटित गुन्हेगारी आणि इतर सुरक्षा धोक्यांचा सामना करण्यासाठी प्रादेशिक सहकार्य वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

७. सार्वभौमत्वाचा आदर आणि सर्वसमावेशक कनेक्टिव्हिटी

SCOच्या सनदेनुसार सर्व सदस्य देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे. त्याचबरोबर विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक कनेक्टिव्हिटी विकसित करण्याची गरज आहे. या माध्यमातून विकसनशील आणि गरीब देशांच्या आकांक्षांना बळ मिळाले पाहिजे, अशी भारताची भूमिका आहे.

८. व्यापार आणि लॉजिस्टिक्स सुलभ करण्यावर भर

सीमाशुल्क प्रक्रिया अधिक सुलभ करणे, डिजिटल दस्तऐवजीकरणाचा विस्तार करणे आणि लॉजिस्टिक्स नेटवर्क अधिक कार्यक्षम बनवणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी सांगितले. यामुळे SCO देशांमधील व्यापार आणि आर्थिक कनेक्टिव्हिटीला चालना मिळू शकते.

९. जनतेतील संपर्क वाढवण्यावर भर

SCO सहकार्याच्या केंद्रस्थानी लोकांमधील संबंध असणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. युवक, उद्योजक, शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी सहकार्याच्या माध्यमातून अधिक संधी निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

१०. युवक, विज्ञान आणि संस्कृतीच्या देवाणघेवाणीला चालना

युवक, वैज्ञानिक, उद्योजक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील देवाणघेवाण वाढवण्यावरही मोदी यांनी भर दिला. SCO स्टार्ट-अप फोरम, यंग ऑथर्स कॉन्क्लेव्ह, यंग सायंटिस्ट्स फोरम आणि प्रस्तावित SCO सिव्हिलायझेशनल डायलॉग फोरम यांसारख्या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला. यातील पहिल्या सत्राचे आयोजन भारतात करण्याची माहितीही देण्यात आली.

दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश

SCOच्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. प्रादेशिक शांतता आणि विकासासाठी सुरक्षा, परस्पर सहकार्य आणि विश्वासार्ह कनेक्टिव्हिटी मजबूत करणे आवश्यक असल्याचा संदेश त्यांनी दिला.