पाकिस्तानने निकालाचे केले स्वागत; माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांची भारतावर टीका
नवी दिल्ली : सिंधू जल करारासंदर्भात हेगस्थित आंतरराष्ट्रीय लवादाने पाकिस्तानच्या बाजूने निकाल दिल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाद पुन्हा चर्चेत आला आहे. या निकालाचे पाकिस्तानकडून स्वागत करण्यात आले असून, पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी भारताच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.
हिना रब्बानी खार यांनी लवादाच्या निकालाची प्रत सोशल मीडियावर शेअर करत भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. भारताचा हा निर्णय आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कसोटीवर टिकणार नसल्याचा दावा त्यांनी केला.
‘भारताचा निर्णय आंतरराष्ट्रीय कायद्यासमोर टिकणार नाही’
हिना रब्बानी खार म्हणाल्या की, सिंधू जल करार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय एकतर्फी आणि मनमानी आहे. अशा प्रकारचा निर्णय कोणत्याही आंतरराष्ट्रीय न्यायालयात टिकणार नाही, असा दावा त्यांनी केला.
त्यांनी पुढे भारताने आपल्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचेही म्हटले.
पाकिस्तानकडून निकालाचे स्वागत
या निकालाचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही स्वागत केले आहे. सिंधू जल कराराच्या अंमलबजावणीसंदर्भात लवादाने दिलेला निर्णय महत्त्वाचा असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
लवादाने सिंधू जल करार लागू असल्याचे नमूद करत भारताने करारातील आपल्या जबाबदाऱ्या पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
भारताने लवादाचा अधिकारच नाकारला
दरम्यान, भारताने या लवादाच्या प्रक्रियेलाच मान्यता दिलेली नाही. लवादाची स्थापना आणि त्याला या प्रकरणावर निर्णय देण्याचा अधिकार असल्याच्या भूमिकेलाच भारताने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे लवादाचा निकाल भारताला मान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सिंधू जल कराराच्या मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तानच्या भूमिकांमध्ये आधीपासूनच मोठी दरी आहे. त्यामुळे या निकालानंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.