Skip to content
Menu

“सणांचे पावित्र्य राखा, गोंगाट नको”-उद्धव ठाकरें

September 8, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या

मुंबई : सण-उत्सवांचा आनंद साजरा करताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. सणांचे पावित्र्य जपले पाहिजे, त्याचे रूपांतर गोंगाटात होता कामा नये, असे मत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. डीजेच्या वाढत्या आवाजावरून त्यांनी सरकारला नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा सल्ला दिला.

मातोश्री येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीत जनतेला एकत्र आणण्यासाठी केली. पुढे त्याचे रूपांतर उत्सवात झाले. मात्र, आता उत्सवाचा अर्थ केवळ दणदणाट असा होऊ नये. झांज किंवा मंदिरातील घंटानादही त्यापेक्षा सुखद वाटतो. उत्सव हे लोकांच्या आनंदासाठी असावेत, त्यांच्या त्रासासाठी नव्हे, असे त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्तांची बैठक घेण्याची मागणी

डीजे बंदीच्या मुद्द्यावर सर्व पोलीस आयुक्तांची बैठक घेऊन एकसमान भूमिका ठरवावी, अशी मागणी ठाकरेंनी केली. “सरकारने या विषयावर चर्चा का करू नये? कोणाची भूमिका योग्य आहे, हे चर्चेतून ठरवा. लोकांना उत्सव हवेत; मात्र त्यातून होणारा त्रास नको,” असे ते म्हणाले.

उत्सवांमध्ये ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी डेसिबल मोजले जाते. त्यामुळे कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सव मंडळांशी संवाद साधण्याचा सल्ला

सरकारने गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करावी. आपण मुख्यमंत्री असताना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होतो. संवादातून अनेक वादग्रस्त मुद्दे टोकाला जाण्यापासून रोखता येतात, असे ठाकरे म्हणाले.

“प्रत्येकाचे घर समाजातच आहे. मग एवढ्या मोठ्या आवाजात स्पीकर लावण्याची गरज काय? डीजेची खरोखरच गरज आहे का? त्यातून होणाऱ्या त्रासाबाबत चर्चा झाली पाहिजे,” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

MPSC आंदोलनालाही पाठिंबा

दरम्यान, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला. पेपरफुटीच्या घटनांवरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

“आमदार फुटले की ते सुरत, गुवाहाटीला जातात; पण पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी कुठे जायचे?” असा सवाल त्यांनी केला. पेपरफुटीचा प्रश्न हसण्यावारी नेण्यासारखा नसून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होत असल्याचे ठाकरे म्हणाले.

राज्यातील सत्ताधाऱ्यांचे लक्ष आमदार आणि नगरसेवकांच्या राजकारणाकडे अधिक आहे, मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. “पेपर फुटत नाहीत, तर विद्यार्थ्यांचे भविष्य फुटत आहे,” असा घणाघात करत केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांना सरकार चालवता येत नसल्याची टीकाही त्यांनी केली.