युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; ८२२ ड्रोन डागल्याचा दावा
मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धात पुन्हा एकदा मोठी हवाई कारवाई झाल्याचा दावा करण्यात आला आहे. युक्रेनने रशियातील क्षेपणास्त्र निर्मितीशी संबंधित कारखाना आणि लष्करी धावपट्टीला लक्ष्य करत मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, रात्रीच्या कारवाईत ८२२ युक्रेनियन ड्रोन पाडण्यात आले.
युक्रेनच्या सैन्याने या हल्ल्याला युद्ध सुरू झाल्यापासूनचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला असल्याचे म्हटले आहे.
क्षेपणास्त्रांसाठी घन इंधन तयार करणाऱ्या कारखान्याला लक्ष्य
युक्रेनच्या हल्ल्यात रोस्तोव भागातील क्षेपणास्त्रे आणि रॉकेटसाठी लागणारे घन इंधन तयार करणाऱ्या प्रमुख औद्योगिक केंद्राला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा आहे. युक्रेनियन सैन्याच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी विविध क्षेपणास्त्र प्रणाली, मल्टिपल रॉकेट लाँच सिस्टीम आणि हवेत मारा करणाऱ्या शस्त्रांसाठी वापरले जाणारे सॉलिड रॉकेट प्रोपेलेंट तयार केले जाते.
हल्ल्यानंतर संबंधित परिसरात मोठी आग लागल्याचेही युक्रेनकडून सांगण्यात आले आहे.
मॉस्कोकडे ६०० हून अधिक ड्रोन?
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नष्ट करण्यात आलेल्या ८२२ ड्रोनपैकी ६०० हून अधिक ड्रोन मॉस्कोच्या दिशेने येत होते. या मोठ्या प्रमाणातील ड्रोन हल्ल्यामुळे रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर मोठा ताण आल्याचे चित्र आहे.
सहा जणांचा मृत्यू
हल्ल्यांमध्ये रोस्तोव आणि मॉस्को परिसरात मिळून किमान सहा जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे. रोस्तोव भागातील तीन शहरांवर झालेल्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्यपाल युरी स्ल्यूसार यांनी दिली.
मॉस्को परिसरात एका ड्रोनचा खासगी घरावर आघात झाला. या घटनेत ८३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.
लष्करी एअरबेसलाही लक्ष्य
युक्रेनियन सैन्याने रशियातील ‘निजनी’ येथील लष्करी एअरबेसलाही लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. याच तळावरून रशियन लढाऊ विमाने युक्रेनविरोधातील कारवायांसाठी उड्डाण करत असल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे.
या हल्ल्यामुळे एअरबेससह क्षेपणास्त्र निर्मितीशी संबंधित केंद्राला मोठे नुकसान झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. मात्र, या नुकसानीची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.