Skip to content
Menu

नवी मुंबई विमानतळावर उड्डाणांची संख्या घटली

August 16, 2026
देश-विदेश

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीच्या काळात हवाई वाहतुकीत चांगली वाढ नोंदवली होती. मात्र, आता या वाढीला काहीसा ब्रेक लागला असून, जुलैमध्ये विमानतळावरील दररोजच्या विमानफेऱ्यांची संख्या सुमारे १०० वर आली आहे.

२५ डिसेंबर रोजी व्यावसायिक विमानसेवा सुरू झाल्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत विमानफेऱ्यांमध्ये सातत्याने वाढ झाली. मात्र, जूनपासून हा वेग कमी झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

मेच्या तुलनेत जूनमध्ये १७ टक्के घट
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात नवी मुंबई विमानतळावर विमानांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या एकूण ४,४८७ फेऱ्या झाल्या. जूनमध्ये ही संख्या ३,७०१ वर आली. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात विमानफेऱ्यांमध्ये सुमारे १७ टक्क्यांची घट झाली.

दररोजच्या सरासरीचा विचार केला तर मेमध्ये सुमारे १४५ फेऱ्या होत होत्या. जूनमध्ये हा आकडा १२३ वर आला. जुलैमध्ये त्यात आणखी घट होऊन दररोज सुमारे १०० फेऱ्या नोंदल्या गेल्या.

विमान कंपन्यांच्या वाढत्या खर्चाचा परिणाम
नवी मुंबई विमानतळावरील या घसरणीमागे विमान कंपन्यांच्या वाढलेल्या खर्चाचाही मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. त्याच काळात रुपयाच्या तुलनेत डॉलरही मजबूत झाला.

याचा थेट परिणाम विमान कंपन्यांच्या इंधन, देखभाल, विमान भाडे आणि इतर डॉलरशी संबंधित खर्चावर झाला. वाढता खर्च नियंत्रणात आणण्यासाठी विमान कंपन्या नवीन किंवा अतिरिक्त क्षमतेतील काही उड्डाणे कमी करण्याला प्राधान्य देत असल्याचे उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.

नवी मुंबई विमानतळाने आपले हवाई नेटवर्क विस्तारण्यास सुरुवात केली असतानाच या खर्चकपातीचा परिणाम विमानफेऱ्यांवर झाला आहे.

मुंबई आणि दिल्ली विमानतळावरही घट
नवी मुंबई विमानतळापुरतीच ही परिस्थिती मर्यादित नाही. देशातील प्रमुख विमानतळांवरही जूनमध्ये देशांतर्गत विमानफेऱ्यांमध्ये घट झाली.

दिल्ली : मे – ३३,३२५ | जून – २९,५८८

मुंबई : मे – २०,९७० | जून – १८,०७५

नवी मुंबई : मे – ४,४८७ | जून – ३,७०१

मात्र, नवी मुंबई विमानतळावरील घट तुलनेने अधिक ठळक दिसून येते.

हंगामी कारणांचाही परिणाम
जून आणि जुलै हे विमान प्रवासाच्या दृष्टीने तुलनेने कमी मागणीचे महिने मानले जातात. त्यामुळे सध्याच्या घसरणीमागे केवळ विमान कंपन्यांचा वाढलेला खर्च नाही, तर हंगामी मागणीतील घटही कारणीभूत असल्याचे दिसते.

ऑगस्टच्या मध्यापासून प्रवासी संख्या वाढण्यास सुरुवात होते. त्यानंतर सणासुदीचा हंगाम सुरू होत असल्याने विमान वाहतुकीला पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळावरील सध्याची घट कायम राहते की आगामी काळात विमानफेऱ्यांना पुन्हा चालना मिळते, याकडे विमान वाहतूक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.