Skip to content
Menu

डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर ‘FDA’ ची मोठी कारवाई

August 14, 2026
देश-विदेश,महाराष्ट्र,मुख्य बातम्या

राज्यभर धडाकेबाज कारवाई करणाऱ्या तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या एफडीएने आता पुण्यामध्ये मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील कँप परिसरातील बर्गर किंगमध्ये (Burger King) अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळून आल्यामुळे त्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे. दररोज हजारो खवय्यांची तुफान गर्दी होणाऱ्या या आऊटलेटवर थेट परवाना रद्द करण्याची कारवाई झाल्याने पुणेकर खवय्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबईत डॉमिनोज पिझ्झावर (Domino’s Pizza) धडक कारवाई केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आता आपला मोर्चा पुण्यातील प्रसिद्ध फूड जॉईंट्सकडे वळवला आहे. पुण्यातील कँप (Camp Area) परिसरात असलेल्या अत्यंत सुप्रसिद्ध ‘बर्गर किंग’वर एफडीएने अचानक छापेमारी करत शाखेचा अन्न परवाना (Food License) जागेवरच रद्द केला आहे.

FDA Action Burger King : परवाना रद्द करण्याचे मुख्य कारण काय?
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कँप येथील बर्गर किंग आऊटलेटला अचानक भेट देऊन पाहणी केली असता, तेथे अन्नसुरक्षा आणि गुणवत्तेसंदर्भात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या.

प्रचंड अस्वच्छता : किचन आणि अन्न साठवणुकीच्या जागी भीषण अस्वच्छता आढळली, जे कारवाईचे प्रमुख कारण ठरले.

अन्न मानकांचे उल्लंघन : खाद्यपदार्थ तयार करताना आणि साठवताना एफडीएच्या (FSSAI) नियमावलीचे स्पष्ट उल्लंघन होत असल्याचे समोर आले.

आरोग्यास धोका : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने प्रशासनाने कोणताही विलंब न करता तात्काळ परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

Tukaram Mundhe FDA Strict Message : नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई
मुंबईत डॉमिनोज, मॅकडॉनल्ड्स आणि बर्गर किंगच्या विविध आऊटलेट्सवर धाडी टाकल्यानंतर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आता राज्यभर तीव्र करण्यात आली आहे. पुण्यातील इतरही प्रसिद्ध हॉटेल्स आणि फास्ट-फूड आऊटलेट्स एफडीएच्या रडारवर असून, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेबाबत निष्काळजीपणा आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.

FDA Tukaram Mundhe Action In Mumbai : मुंबईत छापेमारी
एफडीएच्या पथकाने 11 ऑगस्ट रोजी मुंबईतील मॅकडॉनल्ड्स, बर्गर किंग आणि डॉमिनोजसारख्या एकूण 104 खाद्य आस्थापनांवर अचानक धाडी टाकल्या होत्या. त्यामध्ये अन्न सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याचं दिसल्यानंतर एफडीएने डॉमिनोज पिझ्झाचे तीन आऊटलेट्स बंद केले.