चेन्नई : दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या क्रिकेटिंग सेन्सची झलक दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ईस्ट झोनचा कर्णधार ईशान किशन DRS घेण्याबाबत साशंक असताना वैभवने त्याला रिव्ह्यू घेण्याचा आग्रह केला आणि त्याचा अंदाज अगदी अचूक ठरला.
ईस्ट झोन आणि साऊथ झोन यांच्यात चेन्नईत अंतिम सामना सुरू आहे. ईस्ट झोनने पहिल्या डावात तब्बल 708 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या साऊथ झोनला सुरुवातीलाच मोठा धक्का देण्याची संधी ईस्ट झोनला मिळाली.
सामन्याच्या सहाव्या षटकात मुकेश कुमार गोलंदाजी करत होता. त्याच्या गोलंदाजीवर रिकी भुईच्या बॅटची कडा लागून चेंडू यष्टीरक्षक ईशान किशनच्या दिशेने गेला. ईस्ट झोनच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले; मात्र मैदानावरील पंचांनी अपील फेटाळून भुईला नाबाद घोषित केले.
वैभवने दिला ईशानला सल्ला
चेंडू बॅटला लागल्याची वैभव सूर्यवंशीला खात्री होती. त्याने तातडीने कर्णधार ईशान किशनकडे जाऊन DRS घेण्याचा आग्रह केला. ईशान सुरुवातीला काहीसा संभ्रमात होता. मात्र, वैभवचा आत्मविश्वास पाहून त्याने अखेर रिव्ह्यू घेतला.
DRSमध्ये अल्ट्राएज तपासण्यात आल्यानंतर चेंडू बॅटच्या कडेला लागल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मैदानावरील पंचांना आपला निर्णय बदलावा लागला आणि रिकी भुईला बाद घोषित करण्यात आले.
अवघ्या 15 वर्षांच्या वैभवने दाखवलेली ही क्रिकेटची जाण पाहून मैदानातील खेळाडूंसह चाहत्यांनीही त्याचे कौतुक केले. कर्णधाराला DRS घेण्यास सांगून त्यातून विकेट मिळवून देण्याचा हा प्रसंग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
साऊथ झोनची फलंदाजी
ईस्ट झोनने पहिल्या डावात 708 धावा केल्यानंतर साऊथ झोनसमोर मोठे लक्ष्य उभे राहिले. साऊथ झोनने दोन गडी गमावून 126 धावा केल्यानंतर आणखी दोन विकेट झटपट गमावल्या.
शेख रशीद 48 चेंडूंमध्ये पाच चौकारांच्या मदतीने 27 धावा करून मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर मुकेश कुमारने देवदत्त पडिक्कलला झेलबाद केले. पडिक्कलने 104 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 62 धावा केल्या.
मुकेश कुमारने दोन विकेट घेतल्या असून मोहम्मद शमी आणि शिखर मोहन यांच्या खात्यात प्रत्येकी एक विकेट आहे. सध्या तिलक वर्मा आणि स्मरण रविचंद्रन फलंदाजी करत आहेत. रिकी भुई एका धावेवर, तर नारायण जगदीसन 32 धावांवर बाद झाला आहे.