रस्त्यांवर अणकुचीदार अडथळे; जंतर-मंतरकडे जाण्याचा आंदोलकांचा प्रयत्न, दीपक दिल्लीकडे रवाना
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया थांबवण्याची मागणी करत दिल्लीतील जंतर-मंतर आणि कनॉट प्लेस परिसरात आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनादरम्यान युट्युबर ध्रुव राठी यांच्यासह ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या सुमारे ६०० समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
आंदोलकांना संबंधित परिसरातून हटवण्याची कारवाई सुरू असून, काही ठिकाणी पोलीस आणि निदर्शकांमध्ये झटापट झाल्याचे वृत्त आहे. आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी रस्त्यांवर अणकुचीदार स्पाइक्स लावण्यात आले आहेत. या घडामोडींमुळे राजधानीतील आंदोलनाला तणावाचे स्वरूप आले आहे.
दरम्यान, दीपक मुंबईहून दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आंदोलनावर करण्यात येत असलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना त्यांनी, “हे भीतीचे लक्षण आहे, ताकदीचे नाही,” असे म्हटले आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. बीएसएफच्या जवानांसह ३८ हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याचे वृत्त आहे. तसेच नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर येणाऱ्या २५० मेल व एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव ४५ मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली असून, १० स्थानबद्धता केंद्रेही उभारण्यात आली आहेत. इंडिया गेटच्या चार किलोमीटर परिसरात शुक्रवार रात्री १० वाजल्यापासून शनिवार रात्री १० वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
आंदोलनाचा विस्तार आणि संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाकडून सुरक्षेचे उपाय वाढवण्यात आले आहेत. या कारवाईमुळे दिल्लीतील वाहतूक, रेल्वे आणि मेट्रो सेवांवरही परिणाम झाला आहे.