मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कारभारावर आक्षेप घेत तसेच लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी मुंबईत ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चातून दोन्ही नेत्यांनी केंद्र सरकार तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेपासून केंद्र सरकारच्या कारभारापर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ‘हा लढा कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसून स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “देशात हुकूमशाह तयार होत असेल, तर त्याला याच देशात गाडण्यासाठी आम्ही उभे आहोत.” देशात हुकूमशाहीचा प्रवास सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
मतदार यादीतील बदलांवरून सवाल
राज ठाकरे यांनी मांडलेल्या मतदारांच्या आकडेवारीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी मतदार यादीतील बदलांवर प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील सुमारे दोन कोटी मतदारांसह देशभरात 13 कोटी मतदार वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील मतदारांच्या नावांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. बंगालमध्ये वगळण्यात आलेल्या काही मतदारांची नावे पुन्हा वैध ठरल्याचा दावा करत, आगामी पोटनिवडणुकीत त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार का, असा सवाल त्यांनी केला.
या प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेलाही विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती पक्षपातीपणे’
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेवरही उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याच्या समितीतील बदलावर त्यांनी टीका केली.
पूर्वी या समितीत सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते यांचा समावेश होता. मात्र, सरन्यायाधीशांना समितीतून हटवून त्यांच्या जागी केंद्र सरकारच्या पसंतीचा मंत्री आणण्यात आल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
या बदलानंतर ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ही नियुक्ती पक्षपाती पद्धतीने झाल्याचा आरोप त्यांनी केला.
‘भाजपला सरकार चालवता येत नाही’
केंद्रातील भाजप सरकारच्या कारभारावरही उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. “भारतीय जनता पक्षाला सरकार चालवता येत नाही. प्रशासन आणि भाजप हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत,” असे ते म्हणाले.
सरकारकडून प्रशासनाचा वापर राजकीय सूडासाठी केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशभरात ‘व्होट चोर’विरोधात वातावरण तयार होत असल्याचे सांगत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
कायदा-सुव्यवस्थेवरूनही सरकारला घेरले
ठाण्यातील एका हत्येचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महिला अत्याचाराच्या घटनांवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली.
“गृहमंत्री कुठे आहेत? कुठे आहे तुमचे हिंदुत्ववादी सरकार?” असा सवाल करत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले.
‘रस्ते जनतेच्या मालकीचे’
निवडणूक आयोग आणि प्रशासनावर सरकारचे नियंत्रण असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाचा पुढील इशाराही दिला.
“संस्था आणि प्रशासन तुमच्या ताब्यात असतील, पण रस्ते जनतेच्या मालकीचे आहेत. या रस्त्यांवर उद्या तुम्हाला फिरणे मुश्किल होईल,” असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
उद्धव ठाकरे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे ‘गर्जना मोर्चा’दरम्यान निवडणूक आयोग, मतदार यादी आणि सरकारच्या कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आला आहे.