Gold-Silver Price Today : गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोने आणि चांदीच्या बाजारावर होत असून, दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अवघ्या 24 तासांत सोन्याच्या दरात 3,500 रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल 7,000 रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमधील व्यापारविषयक तणावाकडे जगभरातील बाजारांचे लक्ष लागले होते. दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये झालेल्या बैठकीनंतर आर्थिक करार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घडामोडींचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील मौल्यवान धातूंच्या किमतीवर झाला असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून आला आहे.
दीड लाखांवर गेलेले सोन्याचे दर खाली
गेल्या महिनाभरात वस्तू व सेवा कर (GST) वगळता सोन्याचा दर 1.50 लाख रुपयांच्या पुढे गेला होता. दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता अचानक घसरण झाली आहे.
काल सोन्याचा दर 1,51,500 रुपये होता. आज तो 3,500 रुपयांनी कमी होऊन 1,48,000 रुपयांवर आला आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही मोठी घट झाली आहे. काल 2,32,000 रुपये प्रति किलो असलेली चांदी आज 2,25,000 रुपये प्रति किलोवर आली आहे.
सुवर्ण व्यावसायिक सागर भंगाळे यांच्या मते, अमेरिका आणि चीन यांच्यात झालेल्या आर्थिक करारामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दबाव निर्माण झाला असून, त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतीवर झाला आहे. दरात अचानक झालेल्या घसरणीमुळे स्थानिक बाजारात खरेदी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदी वाढण्याची शक्यता
सोन्याचे दर सातत्याने वाढत असल्याने काही काळापासून ग्राहकांकडून खरेदीला मर्यादा आल्या होत्या. मात्र, आता दरात मोठी घट झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. लग्नसराई तसेच आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कमी दराचा फायदा घेण्यासाठी ग्राहक सराफा बाजाराकडे वळताना दिसत आहेत.
दर कमी झाल्याने सोने आणि चांदी खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील काळात मौल्यवान धातूंच्या दरातील चढ-उताराकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.