Skip to content
Menu

मोदींच्या भेटीनंतर जुन्या वर्गमित्राच्या जमिनीचा प्रश्न मार्गी

September 16, 2026
देश-विदेश,मुख्य बातम्या

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शाळेतील वर्गमित्र असगर अली वोरा यांच्या जमिनीच्या वादावर अखेर तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ८१ वर्षीय वोरा यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांची भेट घेत आपल्या जमिनीबाबतची तक्रार मांडली होती. त्यानंतर संबंधित प्रकरणात प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या.

मीरा रोड येथे राहणाऱ्या वोरा यांच्या म्हणण्यानुसार, भाईंदर पूर्वेकडील नवघर परिसरातील त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण झाले होते. या प्रकरणाचा अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्याने त्यांनी थेट पंतप्रधानांची भेट घेतली होती.

वोरा आणि नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वडनगर येथील बी.एन. स्कूलमध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे.

२,८१० चौरस मीटर भूखंडाचा वाद

वोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी १९८९ मध्ये नवघर, भाईंदर (पूर्व) येथे सुमारे २,८१० चौरस मीटर जमीन खरेदी केली होती. मात्र, २०११ मध्ये ‘स्वयं बिल्डर्स’ आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या ‘सेव्हन-इलेव्हन कन्स्ट्रक्शन्स’कडून या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा त्यांचा आरोप होता.

या प्रकरणासाठी वोरा गेल्या सुमारे १५ वर्षांपासून विविध शासकीय कार्यालयांमध्ये पाठपुरावा करत होते. मात्र, अपेक्षित तोडगा न निघाल्याने त्यांनी ८ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

मंत्रालयात महत्त्वाची बैठक

पंतप्रधानांशी झालेल्या भेटीनंतर या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष गेले. मंगळवारी मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी मंत्रालयात संबंधितांची बैठक घेतली.

या बैठकीला असगर अली वोरा, नरेंद्र मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि नगररचनाकार पुरुषोत्तम शिंदे उपस्थित होते.

बैठकीदरम्यान नरेंद्र मेहता यांनी नगररचना विभागाला पत्र दिले. वादग्रस्त भूखंडाचा ताबा सोडत असून, त्यासाठी घेतलेली बांधकाम परवानगीही परत करत असल्याचे त्यांनी पत्रातून कळवले.

वोरा यांच्याविरोधातील तक्रारही मागे

मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जमीन २०१९ मध्ये मर्विन फर्नांडिस यांच्याकडून खरेदी करण्यात आली होती. दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाल्याचे सांगत वोरा यांच्याविरोधात यापूर्वी केलेली तक्रार मागे घेण्याची माहितीही मेहता यांनी पोलीस आयुक्तांना दिली आहे.

अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या जमिनीच्या वादात पंतप्रधान मोदी आणि असगर अली वोरा यांच्या भेटीनंतर प्रशासकीय हालचाली वाढल्या आणि आता आमदार नरेंद्र मेहता यांनी ताबा सोडण्याची भूमिका घेतली आहे.