Skip to content
Menu

बँक कर्मचारी आज संपावर; सलग चार दिवस बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता

September 11, 2026
देश-विदेश,महाराष्ट्र,मुख्य बातम्या

नवी दिल्ली : बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम असेल तर ग्राहकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. बँक कर्मचारी संघटनांनी आज, ११ सप्टेंबर रोजी देशव्यापी एकदिवसीय संप पुकारला आहे. त्यामुळे बँकांच्या नियमित कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या (UFBU) आवाहनानुसार हा संप होत आहे. त्यानंतर १२ आणि १३ सप्टेंबरला शनिवार-रविवारची नियमित सुट्टी असल्याने अनेक ठिकाणी बँकिंग सेवा सलग दिवस बंद राहतील. काही राज्यांमध्ये गणेशोत्सवाच्या सुट्ट्यांमुळे बँका आणखी काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.

बँक कर्मचारी नेमके कोणत्या मागण्यांसाठी संपावर?

बँकिंग क्षेत्रातील विविध प्रश्न आणि सुधारणा याबाबत UFBU कडून अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील प्रमुख मागणी म्हणजे आठवड्यातील कामाचे दिवस पाच करावेत. म्हणजेच शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी बँकांना पूर्ण सुट्टी देण्यात यावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

याशिवाय कामगिरीवर आधारित प्रोत्साहन योजनेचा फेरआढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी संघटनांनी केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या पेन्शन सुधारणांची अंमलबजावणी करावी तसेच आरोग्य विम्याशी संबंधित तरतुदी लागू कराव्यात, अशीही मागणी आहे.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा बँक कर्मचारी संघटनांनी दिला आहे. २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा देशव्यापी संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

त्यानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर २६ ऑक्टोबर २०२६ पासून बेमुदत संप सुरू करण्याचा इशारा संघटनांकडून देण्यात आला आहे.

ऑनलाइन व्यवहार मात्र सुरू राहणार

बँक शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना डिजिटल माध्यमातून बहुतांश आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. UPI, IMPS, NEFT आणि RTGS यांसारख्या ऑनलाइन सेवा सुरू राहण्याची शक्यता आहे. ग्राहकांना GPay, PhonePe आणि Paytm सारख्या UPI माध्यमातून पैसे पाठवता येतील.

एटीएम सेवा उपलब्ध असल्यास ग्राहकांना तेथून रोख रक्कम काढता येईल. तसेच वीज, पाणी आणि गॅसची बिले भरणे, मोबाइल रिचार्ज करणे यासाठी नेट बँकिंग किंवा बँकेच्या मोबाइल अॅपचा वापर करता येईल.

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेनेही ग्राहकांना प्रस्तावित संपाबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे शाखेत जाऊन करावयाचे अत्यावश्यक काम असल्यास ग्राहकांनी बँकेचे कामकाज सुरू होण्याच्या तारखेची खात्री करूनच नियोजन करणे योग्य ठरेल.