वडोदरा : गुजरातमधील वडोदरा येथे ‘नमो फॉर विकसित भारत’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. जेन-झी तरुणांशी संवाद साधण्यापूर्वी मोदी यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. यावेळी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत राहुल गांधी यांचा उल्लेख ‘नाराज फुफा’ असा केला.
विकसित भारताच्या दिशेने देश वेगाने वाटचाल करत असल्याचे सांगताना मोदी यांनी वडोदरातील स्वच्छता अभियानाचेही कौतुक केले. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वच्छतेसाठी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी अभिनंदन केले.
‘२८०० किलोमीटरहून अधिक फ्रेट कॉरिडॉर पूर्ण’
वडोदरा हे गतिशक्तीचे महत्त्वाचे केंद्र बनत असल्याचे सांगत मोदी यांनी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा उल्लेख केला. देशातील २८०० किलोमीटरहून अधिक लांबीचा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आता पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या १२ वर्षांत देशातील काम करण्याची पद्धत आणि कार्यसंस्कृती बदलल्याचा दावा करताना मोदी यांनी या प्रकल्पाच्या जुन्या इतिहासावरही भाष्य केले.
‘फायली फिरत राहिल्या, काम मात्र झाले नाही’
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची संकल्पना अनेक वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती. २००६ मध्ये यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली. मात्र, २०१४ पर्यंत प्रकल्पाच्या फाइल्स एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात फिरत राहिल्या, असा टोला मोदी यांनी लगावला.
२०१४ मध्ये गुजरातच्या जनतेने आपल्याला दिल्लीत पाठवल्यानंतर प्रकल्पाला वेग देण्यात आल्याचे ते म्हणाले. अनेक वर्षांच्या काळात फ्रेट कॉरिडॉरच्या प्रत्यक्ष कामाला अपेक्षित गती मिळाली नव्हती. अशीच कार्यपद्धती कायम राहिली असती, तर पुढील अनेक पिढ्यांनाही हा प्रकल्प पूर्ण झालेला पाहायला मिळाला नसता, असा दावा मोदी यांनी केला.
मालगाड्यांचा वेग वाढला
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे देशाच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. दोन्ही फ्रेट कॉरिडॉरवर दररोज ४३०० हून अधिक मालगाड्या धावत असल्याचा दावा त्यांनी केला.
पूर्वी मालगाडीला १०० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुमारे साडेसहा तास लागत होते. आता हेच अंतर जवळपास निम्म्या वेळेत पार करता येत असल्याचे मोदी यांनी सांगितले. यामुळे वेळेसोबतच इंधनाचीही मोठी बचत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
राहुल गांधींना ‘नाराज फुफा’ म्हणत टोला
फ्रेट कॉरिडॉरमुळे ट्रक वाहतूक करणाऱ्यांचे काय होणार, असा प्रश्न विरोधक उपस्थित करतील, असा टोला मोदी यांनी लगावला. याच संदर्भात त्यांनी राहुल गांधींचा उल्लेख ‘नाराज फुफा’ असा करत विरोधकांवर टीका केली.
देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात मोठ्या प्रमाणात माल पोहोचविणे या नव्या व्यवस्थेमुळे शक्य होणार आहे. रेल्वेची सुविधा ज्या भागांपर्यंत अद्याप पोहोचलेली नव्हती, त्या भागांनाही जोडण्याचे काम सुरू असल्याचे मोदी यांनी सांगितले.
आदिवासी भागांनाही रेल्वे जोडणी
रेल्वेच्या विस्तारामुळे आदिवासी भागातील नागरिकही रेल्वे नेटवर्कशी जोडले जात असल्याचे मोदी यांनी नमूद केले. पूर्वी एखादी नवीन रेल्वे सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर बराच काळ प्रतीक्षा करावी लागत असे. मात्र, आता वर्षभरात मोठ्या संख्येने नवीन रेल्वे सेवा सुरू होत असल्याचा दावा त्यांनी केला.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे देशातील लॉजिस्टिक्स व्यवस्था अधिक गतिमान होऊन उद्योग आणि व्यापाराला त्याचा फायदा होईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.