Skip to content
Menu

पंतप्रधान मोदींकडून वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे लोकार्पण; मालवाहतुकीचा खर्च घटणार

September 8, 2026
देश-विदेश,मुख्य बातम्या

वडोदरा : देशाच्या मालवाहतूक व्यवस्थेला वेग देणाऱ्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या (WDFC) महत्त्वाच्या तीन टप्प्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला समर्पण केले. गुजरातमधील वडोदरा येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजनही केले.

WDFC मधील हे तीन टप्पे कार्यान्वित झाल्यामुळे पश्चिम विभागातील फ्रेट कॉरिडॉरचे संपूर्ण नेटवर्क आता पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. यामुळे रेल्वेच्या माध्यमातून मालवाहतूक अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने होण्यास मदत होणार असून, माल पोहोचविण्याच्या खर्चातही लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे.

JNPA येथूनही सेवेला हिरवा झेंडा

वडोदरा येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, तर महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाच्या (JNPA) परिसरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्तपणे हिरवा झेंडा दाखवत या सेवांचा शुभारंभ केला.

याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते तीन नवीन रेल्वे प्रकल्प आणि तीन महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पांमुळे देशाच्या वाहतूक आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थेला आणखी बळ मिळणार आहे.

‘२८०० किलोमीटरहून अधिक मार्गिका पूर्ण’

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाला देशाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले. या प्रकल्पातील अंतिम दुवे जोडले गेल्यामुळे देशातील २८०० किलोमीटरहून अधिक लांबीची मालवाहतूक मार्गिका पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

२१व्या शतकातील भारतासाठी ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे नमूद करताना, गेल्या बारा वर्षांत देशाच्या कार्यपद्धतीत झालेल्या बदलाचे हे प्रकल्प उदाहरण असल्याचेही मोदी यांनी म्हटले.

२००४ मध्ये मांडली होती संकल्पना

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची संकल्पना सर्वप्रथम २००४ मध्ये मांडण्यात आली होती. त्यानंतर २००६ मध्ये प्रकल्पासाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात आली. मात्र, २०१४ पर्यंत प्रकल्पाची अंमलबजावणी संथ गतीने सुरू होती, अशी टीका पंतप्रधानांनी केली.

२०१४ मध्ये केंद्रात सरकार बदलल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला वेग देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्या वेळी अनेक वर्षे उलटूनही या मालवाहतूक मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामाला अपेक्षित गती मिळाली नव्हती, असा दावा मोदी यांनी केला.

‘लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठा बदल होणार’

भारताची लॉजिस्टिक्स व्यवस्था अधिक सक्षम करण्याची मोठी क्षमता या प्रकल्पात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्याने रेल्वेवरील प्रवासी वाहतुकीचा दबाव कमी होईल. त्याचबरोबर मालाची वाहतूक अधिक वेगाने आणि वेळेत करता येणार आहे.

WDFC पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यामुळे उद्योग, बंदरे, बाजारपेठा आणि उत्पादन केंद्रांमधील मालवाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे. परिणामी देशातील व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रालाही त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.