इचलकरंजी : महाराष्ट्राची वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. इचलकरंजीतील आघाडीची मीडिया व फिल्म प्रॉडक्शन संस्था *‘प्रतिरंग स्टुडिओ एलएलपी’*ने थेट बॉलिवूडमध्ये दमदार प्रवेश केला आहे. संस्थेचे प्रतीक साठे आणि सारंग भांबुरे यांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर व गायक बादशाह तसेच महाराष्ट्रातील लोकप्रिय डिजिटल व्यासपीठ ‘भाडीपा’ (Bhadipa) यांच्या प्रोजेक्टसाठी लाईन प्रोडक्शनची संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रतिरंग स्टुडिओने स्थानिक पातळीवरील आपल्या कामाची व्याप्ती थेट राष्ट्रीय स्तरापर्यंत नेली आहे. शूटिंगसाठी आवश्यक असलेले स्थानिक नियोजन, लोकेशन व्यवस्थापन, मनुष्यबळ, तांत्रिक समन्वय आणि उत्पादनाशी संबंधित विविध जबाबदाऱ्या प्रतिरंग स्टुडिओच्या टीमने प्रभावीपणे हाताळल्या. प्रतिरंग स्टुडिओला यापूर्वी झी मराठी, स्टार प्रवाह, एशियन पेंट्स यांसारख्या नामांकित टेलिव्हिजन वाहिन्या व राष्ट्रीय ब्रँड्ससोबत काम करण्याचा अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर संस्थेने आता बॉलिवूडमधील मोठ्या प्रोजेक्टमध्ये आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. स्थानिक पातळीवरून सुरू झालेला प्रवास राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्टपर्यंत पोहोचवत प्रतिरंग स्टुडिओने इचलकरंजीच्या मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील वाढत्या क्षमतेची नवी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल इचलकरंजीतील कला, मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. यामुळे इचलकरंजी आणि परिसरातील अनेक स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ, छायाचित्रकार, मेकअप आर्टिस्ट, मॉडेल्स तसेच नवोदित प्रतिभावंतांना मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याच्या संधी उपलब्ध होत आहेत. स्थानिक कलागुणांना व्यासपीठ मिळवून देत त्यांना मनोरंजन आणि जाहिरात क्षेत्रातील व्यापक संधींची दारे खुली करण्याचे काम प्रतिरंग स्टुडिओकडून सुरू आहे. त्यामुळे इचलकरंजी परिसरातील नवोदित कलाकारांसाठी प्रतिरंग स्टुडिओ हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.