पुणे : महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. पुण्यात झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसच्या महिला सबलीकरणाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘महिलांना संधी देण्याची वेळ आली तेव्हा प्रियांका गांधींना संधी का दिली नाही?’, असा सवाल राहुल गांधी यांना केला.
महिला आरक्षण विधेयक तसेच मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून संसदेचे पावसाळी अधिवेशन गाजले. विरोधकांनी सरकारच्या भूमिकेवर टीका करत या विषयावर आक्रमक भूमिका घेतली होती. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर निशाणा साधला.
‘काँग्रेसची भूमिका दुटप्पी’
फडणवीस यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसची महिला सबलीकरणाबाबतची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला. महिलांना राजकारणात समान संधी देण्याबाबत काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणावर भूमिका मांडली जाते; मात्र प्रत्यक्षात पक्षाच्या निर्णयांमध्ये महिलांना किती संधी दिली जाते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी प्रियांका गांधी यांच्या राजकीय प्रवेशाचा संदर्भ देत राहुल गांधींना लक्ष्य केले. “काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींना माझा प्रश्न आहे की, महिलांना संधी देण्याची वेळ होती, तेव्हा प्रियांका गांधींना संधी का दिली नाही?” असा सवाल फडणवीस यांनी केला. हा प्रश्न राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांनाही उत्तरावा लागेल, असेही त्यांनी म्हटले.
सोनिया गांधींचाही उल्लेख
आपल्या भाषणात फडणवीस यांनी ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरूनही काँग्रेसवर टीका केली. “वंदे मातरम् हे मातृशक्तीचे मोठे प्रतीक आहे. मात्र, हे गीत सुरू होताच सोनिया गांधी यांनी विरोध केला,” असा दावा त्यांनी केला.
स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत बलिदान दिले, असे सांगत फडणवीस यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. देशाला पितृसत्ताक म्हणणाऱ्यांना ‘वंदे मातरम्’चा जयघोष खटकतो, अशी टीकाही त्यांनी केली.
महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना आणि काँग्रेसची राजकीय भूमिका या मुद्द्यांवरून फडणवीस यांनी केलेल्या या टीकेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.