पुणे : रक्षाबंधनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत अजित पवार यांच्या आठवणीत भावूक पोस्ट केली आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यातील जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी शब्दांत व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या मार्गावर गेले होते. मात्र, राजकीय मतभेद असले तरी दोघांमधील कौटुंबिक नाते आणि भावंडांमधील जिव्हाळा कायम चर्चेत राहिला.
अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. या दुर्घटनेत त्यांच्यासह अन्य पाच जणांचा मृत्यू झाला होता. यंदाच्या रक्षाबंधनाला अजित पवार सोबत नसल्याने सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर भावनिक आठवणी शेअर केल्या.
‘आजही वाटतं, तू अचानक येशील…’
सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आज राखीपौर्णिमा असली तरी यावेळी दादा सोबत नसल्याची जाणीव मनाला अस्वस्थ करणारी आहे. सात महिन्यांपूर्वी घडलेली ती दुर्घटना आणि अजित पवारांचे अचानक निघून जाणे आजही मनाला स्वीकारता आलेले नाही.
लहानपणापासून एकत्र वाढताना झालेली भांडणे, एकमेकांवरील प्रेम आणि परस्परांविषयीचा अभिमान या सगळ्या आठवणी त्यांनी पोस्टमधून जागवल्या.
‘‘आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील आणि बहिणींसोबत गप्पा मारत पुन्हा कुटुंबात रमून जाशील,’’ अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, असेही त्यांनी म्हटले. ते जिथे असतील तिथून त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहावेत, अशी भावनिक अपेक्षाही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.