कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी अखेर अनिर्णित राहिली. भारताने पहिल्या डावात उभारलेल्या मोठ्या धावसंख्येनंतर विजयाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, श्रीलंकेच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत कडवा प्रतिकार करत सामना वाचवला. विशेषतः सोनल दिनूषाच्या संयमी आणि झुंजार शतकामुळे भारताच्या विजयाच्या आशांना धक्का बसला.
दुसरी कसोटी अनिर्णित राहिली असली तरी मालिकेतील पहिल्या सामन्यात मिळवलेल्या विजयाच्या जोरावर भारताने दोन सामन्यांची मालिका १-० अशी जिंकत ट्रॉफीवर नाव कोरले.
भारताचा पहिला डाव ५०३ धावांवर घोषित
भारताने पहिल्या डावात ९ बाद ५०३ धावा करून डाव घोषित केला. ध्रुव जुरेलने शानदार फलंदाजी करत नाबाद ११५ धावांची खेळी केली. १७७ चेंडूंचा सामना करताना त्याने ९ चौकार आणि २ षटकार ठोकले.
देवदत्त पडिक्कलनेही शतक झळकावत ११७ धावा केल्या. त्याने १९३ चेंडूंमध्ये १२ चौकारांच्या मदतीने ही खेळी साकारली. कर्णधार शुभमन गिलने ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. ऋषभ पंतने ६३, तर रवींद्र जडेजाने ४३ धावांचे योगदान दिले.
श्रीलंकेचा पहिला डाव २९० धावांवर आटोपला
भारताच्या ५०३ धावांना उत्तर देताना श्रीलंकेचा पहिला डाव २९० धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताला आघाडी मिळाली आणि सामन्यावर त्याचे वर्चस्व निर्माण झाले.
मात्र, श्रीलंकेकडून सोनल दिनूषाने जबरदस्त प्रतिकार केला. त्याने १६२ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ३ षटकारांसह १०३ धावांची खेळी केली. त्याला पथुम निस्सांकाने साथ देत ८० धावा केल्या. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
दुसऱ्या डावातही श्रीलंकेचा दमदार प्रतिकार
फॉलोऑननंतर श्रीलंकेने दुसऱ्या डावात १५४ षटकांत ९ बाद ४२९ धावा केल्या. या डावात पथुम निस्सांकाने १७३ चेंडूंचा सामना करत ९२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
मात्र, पुन्हा एकदा सोनल दिनूषा श्रीलंकेच्या मदतीला धावून आला. त्याने तब्बल २६४ चेंडू खेळत नाबाद १३३ धावा केल्या. त्याच्या संयमी फलंदाजीमुळे श्रीलंकेने भारतीय गोलंदाजांना विजयापासून दूर ठेवले.
दिनूषाच्या या खेळीत ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. संकटाच्या परिस्थितीत जवळपास संपूर्ण दिवस फलंदाजी करत त्याने सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
मालिकेवर भारताचे नाव
दुसरी कसोटी अनिर्णित राहिल्याने भारताला या सामन्यात विजय मिळवता आला नाही. मात्र, पहिल्या कसोटीत मिळवलेल्या विजयामुळे भारताने मालिका १-० अशी आपल्या नावे केली.
सोनल दिनूषाच्या दोन्ही डावांतील झुंजार फलंदाजीचे विशेष कौतुक होत असून, त्याच्या शतकांमुळे श्रीलंकेला भारताविरुद्ध दुसरी कसोटी वाचवण्यात यश आले.
