Skip to content
Menu

‘टॉक्सिक’ची बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात; पहिल्याच दिवशी १०१ कोटींची कमाई

August 27, 2026
मनोरंजन

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत दमदार सुरुवात केली आहे. ‘केजीएफ २’नंतर यशचा हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून, पहिल्याच दिवशी चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शनची आकडेवारी देणाऱ्या Sacnilkनुसार, ‘टॉक्सिक’ने भारतात पहिल्या दिवशी १०१.१० कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. चित्रपटाची ग्रॉस कमाई १२०.७५ कोटी रुपये, तर जगभरातील पहिल्या दिवसाचे कलेक्शन १४०.७५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

पहिल्या दिवसाच्या कमाईत चार मोठ्या चित्रपटांना मागे टाकले

या दमदार ओपनिंगमुळे ‘टॉक्सिक’ भारतातील सर्वाधिक ओपनिंग मिळवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. यशच्या चित्रपटाने ‘कल्की २८९८ एडी’, ‘सालार’, ‘आदिपुरुष’ आणि ‘साहो’ या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा मागे टाकला आहे.

भारतामधील पहिल्या दिवसाच्या कमाईच्या यादीत ‘पुष्पा २’, ‘धुरंधर २’, ‘RRR’, ‘बाहुबली २’ आणि ‘केजीएफ चॅप्टर २’ हे चित्रपट ‘टॉक्सिक’च्या पुढे आहेत.

हिंदीत सर्वाधिक कमाई

‘टॉक्सिक’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईत हिंदी भाषेचा मोठा वाटा असल्याचे आकडेवारीवरून दिसते. चित्रपटाने हिंदीत सुमारे ५५ कोटी रुपये, कन्नडमध्ये २३.३० कोटी, तेलुगूमध्ये १६ कोटी, तमिळमध्ये ५.५० कोटी आणि मल्याळममध्ये १.३० कोटी रुपये कमावल्याचे सांगितले जात आहे.

यशच्या नावावर पुन्हा १०० कोटींची ओपनिंग

‘टॉक्सिक’ हा यशचा पहिल्याच दिवशी १०० कोटींचा आकडा पार करणारा सलग दुसरा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ चॅप्टर २’नेही पहिल्याच दिवशी तब्बल ११६ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे ‘टॉक्सिक’च्या पुढील दिवसांच्या कमाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटात यशसोबत हुमा कुरैशी, नयनतारा आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आगामी दिवसांत त्याच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.