इचलकरंजी –
प्रकाशआण्णा, ९९६९ साली इचालकरंजीला रेल्वे आणण्याचा प्रस्ताव झाला होता. पण, गेल्या १० वर्षापूर्वी दूरदृष्टी ठेवून इचलकरंजीचा खासदार, आमदार नसतानासुध्दा कोकणातील खासदार सुरेश प्रभू यांनी किती मोठी दूरदृष्टी ठेवली की इचलकरंजी हे मँचेस्टर शहर आहे आणि शहराला रेल्वेची आवश्यकता आहे, त्यामुळे सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंजूर केली आणि रेल्वे आणण्यासाठी रेल्वेच्या खात्यावर १२ कोटी रुपये पाठवले. पण, त्याची पुढील प्रक्रिया तुम्ही करु शकला नाही आणि गेली ४० वर्षे झाली इचलकरंजीत आमदार, खासदार, मंत्री सगळी पदे तुम्ही भोगलीत. पण, इचलकरंजीला ४० वर्षात रेल्वे आणली नाही. इचलकरंजीला स्वतंत्र तालुका करु शकला नाही, इचलकरंजीला एखादा नॅशनल हाय-वे आणू शकला नाही, इचलकरंजीला कागलसारखी पंचतारांकित एमआयडीसी आणू शकला नाही, इचलकरंजीला एक पर्यटनस्थळासारखा एखादा भव्यदिव्य प्रोजेक्ट आणू शकला नाही, तरीही गेल्या ४० ते ४५ वर्षात इचलकरंजीने प्रकाशआण्णा तुमच्यावर भरभरुन प्रेम केले. पण, तुम्ही इचलकरंजीच्या वैभवात, इतिहासात नोंद होईल असे एकही काम करु शकला नाही.
कोकणातील रेल्वे मार्ग एवढा अवघड होता नकाशावर की, तो रेल्वे मार्गच नेणे अशक्य होते. पण, तत्कलीन रेल्वे मंत्री मधु दंडवते यांनी स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर मुंबई-गोवा रेल्वे मार्ग करून कोकणला रेल्वेच्या नेले आणि या देशातील इतिहासात कोकणची रेल्वे मधु दंडवते यांनी आणली, ही नोंद झाली. असेच इतिहासात नोंद होण्यासाठी आण्णा इचलकरंजीचा प्रश्न पहिला मार्गी लावा आणि इचलकरंजीत रेल्वे आणा. इचलकरंजीला स्वतंत्र तालुका करा, इचलकरंजी पर्यटन क्षेत्र होईल अशा दृष्टीने योजना आखा, इचलकरंजीजवळून एखादा नॅशनल हाय-वे नेऊन इचलकरंजीला देशाच्या नकाशावर न्या, इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न गेली १० वर्षे या गावातून की त्या गावातून चालू आहे, असले प्रश्न सोडवले तर मग इचलकरंजीची जनता म्हणेल की, इचलकरंजीसाठी आवाडे यांनी काहीतरी केले आहे. पण, इचलकरंजीत असे कोणतेच चांगले प्रोजेक्ट आणायचे नाहीत, कारखानदारांना लाईट बिल माफ करतो, सबसिडी देतो, मजुरी बाढवून देतो, अशी गाजरं दाखवण्यात आली. ४०-४५ वर्षे झाली आण्णा तुम्ही सत्तेत आहात आणि इचलकरंजीची खुळी जनता तुमच्यावर भरभरुन प्रेम करते. पण, त्या प्रेमाचे प्रतिक म्हणून किंवा प्रेमाची परतफेड म्हणून इचलकरंजीसाठी इतिहासात नाव होईल, अशा योजना तुम्ही कधी आणणार? मग इचलकरंजीला रेल्वे आणा आणि त्याच रेल्वेत बसून तुम्ही दिल्लीला जावा मग तुम्हाला दिल्लीला पाठवण्यासाठी इचलकरंजीचे हजारो लोक येतील आणि दिल्लीहून इचलकरंजीला आल्यानंतर इचलकरंजीच्या रेल्वे स्टेशनवरुन हजारो लोक तुमची भव्य मिरवणूक काढतील. त्यासाठी तुम्हाला इचलकरंजीत रेल्वे आणावीच लागेल तरच तुमचे दिल्लीचे स्वप्न पूर्ण होईल.
आपल्या गावात रेल्वे यावी म्हणून सांगलीला स्व. वसंतदादा पाटील यांनी संघर्ष केला व ४ कि.मी. अंतरावर रेल्वे स्टेशन केले. विलासराव देशमुख आणि गोपिनाथ मुंडे यांनी लातूरला व बीडला संघर्ष करुन रेल्वेचे जाळे पसरले. आण्णा तुम्ही इचलकरंजीला मंजूर असलेली रेल्वेचे इचलकरंजीकरांचे स्वप्न पूर्ण करा, हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे.