Skip to content
Menu

अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; ‘दृश्यम : द कन्क्लुजन’ची घोषणा

August 24, 2026
मनोरंजन

अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; ‘दृश्यम : द कन्क्लुजन’ची घोषणा

मुंबई : ‘दृश्यम’च्या चाहत्यांसाठी अखेर मोठी बातमी समोर आली आहे. अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत परतणार असून, ‘दृश्यम’च्या तिसऱ्या भागाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या नव्या चित्रपटाचे नाव ‘दृश्यम : द कन्क्लुजन’ असे असणार आहे.

चित्रपटाच्या घोषणेसोबत अजय देवगणचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. पोस्टरमध्ये तो पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसत असून, कुटुंबासाठी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची त्याची भूमिका यामध्येही कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

२ ऑक्टोबरला चित्रपटगृहात

‘दृश्यम : द कन्क्लुजन’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘दृश्यम’च्या पुढील कथानकाबाबत प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.

अजय देवगणसोबत तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता, प्रकाश राज, जयदीप अहलावत आणि रजत कपूर यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

‘माझं सत्य म्हणजे माझं कुटुंब’

चित्रपटाच्या पोस्टरवर ‘माझे सत्य, माझा अधिकार, फक्त माझे कुटुंबच आहे’ असा संदेश देण्यात आला आहे. विजय साळगावकरच्या व्यक्तिरेखेची मध्यवर्ती भूमिका पुन्हा एकदा कुटुंबाभोवतीच फिरणार असल्याचे यावरून स्पष्ट होते.

‘दृश्यम’च्या मागील दोन भागांमध्ये विजयने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आखलेल्या योजनांनी प्रेक्षकांची चांगलीच उत्सुकता वाढवली होती. आता या कथेला अंतिम वळण देताना विजयसमोर नेमके कोणते आव्हान उभे राहणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

फर्स्ट-लूक टीझरने वाढवली उत्सुकता

चित्रपटाचा फर्स्ट-लूक टीझर यापूर्वीच प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामध्ये विजय साळगावकरच्या आवाजातून त्याच्या आयुष्यातील संघर्षाची झलक पाहायला मिळते.

गुन्हेगार, खुनी, कपटी, धूर्त, फसवणूक करणारा, नायक किंवा निर्दोष अशा अनेक ओळखी जगाने आपल्याला दिल्या; मात्र त्याला त्याची पर्वा नसून आपल्या कुटुंबाचे रक्षण करणे हेच त्याच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे असल्याचा संदेश टीझरमधून देण्यात आला आहे.

आता ‘दृश्यम : द कन्क्लुजन’मधून विजय साळगावकरच्या कथेचा शेवट नेमका कसा होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.