Skip to content
Menu

आरक्षण हटाव आंदोलनात तणाव; जंतर-मंतरवर ५० हून अधिक आंदोलक ताब्यात

August 22, 2026
देश-विदेश,मुख्य बातम्या

आरक्षण हटाव आंदोलनात तणाव; जंतर-मंतरवर ५० हून अधिक आंदोलक ताब्यात

नवी दिल्ली : देशातील आरक्षण व्यवस्थेत बदल करण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर शुक्रवारी ‘आरक्षण हटाव आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मात्र, निर्धारित वेळ संपल्यानंतरही काही आंदोलकांनी आंदोलनस्थळी थांबून घोषणाबाजी सुरू ठेवल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ५० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले.

या आंदोलनातील प्रमुख मागणी सध्याच्या जातीनिहाय आरक्षण पद्धतीत बदल करून आर्थिक निकषांवर आरक्षण लागू करण्याची होती. आंदोलकांनी हातात फलक घेत ‘आरक्षणाचा लाभ आर्थिकदृष्ट्या गरजू व्यक्तींना मिळावा, केवळ जातीच्या आधारावर नाही’, अशी भूमिका मांडली.

परवानगीची वेळ संपल्यानंतरही आंदोलक ठिय्या देऊन

जंतर-मंतरवर आंदोलनासाठी पोलिसांनी दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी दिली होती. तसेच सुमारे ५०० जणांना एकत्र येण्याची परवानगी होती. निर्धारित वेळ संपल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना परिसर रिकामा करण्याची विनंती केली. मात्र, काही आंदोलकांनी तिथेच थांबून घोषणाबाजी सुरू ठेवली.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्सलाही पाचारण करण्यात आले. अखेर पोलिसांनी कारवाई करत ५० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले आणि जंतर-मंतर परिसर रिकामा केला.

‘जात नव्हे, आर्थिक परिस्थिती निकष ठरावा’

आरक्षणाचा लाभ देताना जात हा प्रमुख आधार न ठेवता संबंधित व्यक्तीची आर्थिक परिस्थिती विचारात घ्यावी, अशी आंदोलकांची भूमिका होती. शिक्षण, सरकारी नोकऱ्या, शिष्यवृत्ती तसेच विविध सरकारी योजनांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

आंदोलकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानुसार, समान आर्थिक परिस्थितीत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या जातीमुळे वेगवेगळ्या संधी मिळणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरक्षण व्यवस्थेचा सध्याच्या परिस्थितीनुसार फेरविचार करण्याची गरज असल्याचे आंदोलकांचे म्हणणे होते.

‘एका कुटुंबाला, एकदा आरक्षणाचा लाभ’ची मागणी

आंदोलनात ‘वन फॅमिली, वन रिझर्वेशन, वन टाइम’ ही मागणीही करण्यात आली. एका कुटुंबातील व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर त्याच कुटुंबाला पुढील पिढ्यांमध्ये सातत्याने आरक्षणाचा लाभ मिळू नये, अशी भूमिका काही आंदोलकांनी मांडली.

याशिवाय आरक्षण व्यवस्थेला कालमर्यादा असावी आणि ठरावीक कालावधीनंतर त्याचा आढावा घेण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली. परिस्थितीनुसार आवश्यक ते बदल आरक्षणाच्या धोरणात करण्यात यावेत, असे आंदोलकांचे म्हणणे होते.

‘वन नेशन, वन आयडेंटिटी’च्या घोषणाही

आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी ‘वन नेशन, वन आयडेंटिटी’च्या घोषणा दिल्या. सार्वजनिक जीवनात जातीचे महत्त्व कमी व्हावे आणि नागरिकांकडे समानतेच्या दृष्टीने पाहिले जावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, आंदोलनाची निर्धारित वेळ संपल्यानंतरही आंदोलकांनी ठिय्या कायम ठेवल्याने पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे जंतर-मंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.