मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं, हा वाद अद्यापही संपूर्णपणे मिटला नसून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेना पक्षाच्यावतीने वरिष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी प्रभावी मांडणी, युक्तिवाद केल्यानंतर आता यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत आज ठाकरेंच्या बाजूने ॲड. देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला. या युक्तिवादात त्यांनी देशातील इतर महत्त्वाच्या खटल्यांचा दाखला दिला. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे दोन्ही वेगळं असल्याचे सांगत त्यांनी उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील खटल्यांची माहिती दिली. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंची बाजू भक्कम झाल्याचा दावा करण्यात येतोय. त्यावर, आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आजच्या सुनावणीत ॲड. देवदत्त कामत यांनी युक्तीवादचा कळस चढवला., कामत यांनी युपी, केरळ, हरियाणा आणि कलकत्ता येथील निकालाचे उदाहरण दिले. त्यामुळे, आजच्या युक्तिवादाने कोर्ट प्रभावित झाले असेल तर आनंद आहे. चिन्हाबाबत युक्तिवाद केला. माझ्यासोबतचा माणूस गेला तर तो पक्षाचा प्रमुख बनतो का? असा सवाल वकिलांनी केला. यावेळी सादिक अली, सुभाष देसाई केसचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती अरविंद सावंत यांनी दिली.
पक्ष आणि विधीमंडळ पक्ष यात फरक आहे, पक्ष हा निरंतर आहे. पक्षातील माणसं गेली म्हणजे पक्ष जात नाही. पुन्हा निवडणूक आयोगाकडे आम्हाला पाठवू नका अशी विनंती कोर्टाला केली आहे. आता, यावर निर्णय घेण्याचा अधिकार कोर्टाचा आहे. मात्र, एकनाथ शिंदेंसोबतचे आमदार अपात्र झाले तर पक्षाचा विषयच येत नाही. चिन्ह देण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत अरविंद सावंत यांनी पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल, असा दावा केलाय.
शिंदेंच्या प्रवक्तव्यांची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. उबाठा यांचा विश्वास निवडणूक आयोगावर नाही, विधी अध्यक्षांवर नाही आणि यापूर्वीच्या निकालावरही विश्वास नाही. उद्या हा निकाल ठाकरे विरोधात गेला तर पुन्हा म्हणतील कोर्टावरही विश्वास नाही, अशी टीका राजू वाघमारे यांनी केली. तसेच, 2018 ची घटना योग्य होती की नव्हती हे ठाकरे सांगत नाहीत. निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही असं म्हणतात. पक्षात हुकूमशाही आहे हे आयोगाला सांगायला पाहीजे. ठाकरेंकडे कोणी हे सांगण्यासाठी गेल्यास ठाकरे त्यांना पार्टीमध्ये ठेवतील का? पार्टीमध्ये बोलायला जागाच नाही. सर्वच लोक नाराज आहेत.
ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसल्यावर ते तुमच्या विरोधात बोलत आहेत, या पक्षाच्या घटनेत हुकूमशाही करून घेतली. 2018 मध्ये घटना बदलण्याचं कारण म्हणजे माझ्या हातात एकछत्री अंमल पाहिजे. बरं घटना दुरूस्त केल्यावर ती आयोगाकडे सबमीट केली नाही, आता ठाकरेंच्या लक्षात आलंय की गौडबंगाल करून त्यांच्याकडे काहीच मुद्दे नाहीत. ठाकरे हायकोर्टाचे उदाहरण दाखवत आहेत, मग तुम्ही हायकोर्टात का गेले नाही, असा सवालही वाघमारे यांनी केला. युतीत लढताना मतांचा फरक काढू शकत नाही, 38-39 आमदारांच्या सोबत स्थानिक संघटन आहे. कोर्टात सांगत होते की, चिन्हाचा फायदा घेत आहेत. आपल्याला माहिती आहे की लोकांची कामं करावी लागतात. तेंव्हा राजकारणात निवडून येतात. उबाठाची वैचारिक दिवाळखोरी कोर्टात पाहायला मिळाली, अशी टीका वाघमारे यांनी केली.