Skip to content
Menu

ईडीची आझम खान यांच्याविरोधात मोठी कारवाई; १० ठिकाणी छापेमारी

August 19, 2026
मुख्य बातम्या,राजकीय

ईडीची आझम खान यांच्याविरोधात मोठी कारवाई; १० ठिकाणी छापेमारी
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आझम खान यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी पहाटे आझम खान आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी सुरू केली.

रामपूर, सहारनपूर आणि नवी दिल्ली अशा विविध ठिकाणी ईडीच्या पथकांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) ही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

ईडीकडून आझम खान यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार, कथित आर्थिक अनियमितता तसेच संशयास्पद निधीच्या व्यवहारांचा तपास केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान संबंधित कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांशी निगडित नोंदींची तपासणी केली जात असल्याची माहिती आहे.

जौहर विद्यापीठाशी संबंधित ठिकाणांवरही तपासणी
ईडीच्या पथकांनी आझम खान यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मौलाना मोहम्मद अली जौहर विद्यापीठाशी संबंधित ठिकाणीही छापेमारी केल्याचे वृत्त आहे. विद्यापीठाशी संबंधित मौलाना मोहम्मद अली जौहर ट्रस्टच्या ठिकाणांचाही तपास केला जात आहे.

याशिवाय रामपूर आणि जौहर विद्यापीठ परिसरातील काही अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचीही झडती घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

ईडीच्या या कारवाईमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, छापेमारीत नेमके काय आढळते आणि पुढील तपासाची दिशा काय असणार, याकडे लक्ष लागले आहे.