नवी दिल्ली : नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP)च्या वतीने आयोजित आंदोलनात सहभागी झालेल्या एका महिलेने गंभीर आरोप करत सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. आपल्याला सातत्याने बलात्कार आणि अपहरणाच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा या महिलेने याचिकेत केला आहे.
शुक्रवारी याचिकाकर्त्या महिलेच्या वकिलांनी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाचा तोंडी उल्लेख केला. महिलेच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर असल्याचे सांगत वकिलांनी न्यायालयाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले.
१८ ऑगस्टला होणार सुनावणी
वकिलांनी न्यायालयात याचिकेचा उल्लेख करताना, याचिकाकर्त्या महिलेला बलात्कार आणि अपहरणाच्या धमक्या सातत्याने मिळत असल्याचे सांगितले. यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी हे प्रकरण येत्या मंगळवारी, १८ ऑगस्ट रोजी सुनावणीसाठी घेण्याचे मान्य केले.
आंदोलनाशी संबंधित इतर प्रकरणांचीही त्याच दिवशी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या महिलेच्या याचिकेवर न्यायालयाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
सध्या या धमक्यांमागे कोण आहे किंवा त्याबाबत कोणती कारवाई करण्यात आली आहे, याची अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र, आंदोलनात सहभागी असलेल्या महिलेने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे.